पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी माननीय प्राचार्य यांनी ध्वजारोहण करून उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी तसेच तुरची गावातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्यांनी प्रशिक्षणार्थींना कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशसेवेची भावना जपत आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.
तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील आपल्या कर्तव्यामध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या अधिकारी व अंमलदारांचा माननीय प्राचार्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य (प्रशिक्षण) श्री. सुनील शेटे यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर चित्रप्रदर्शनास उपस्थित मान्यवर, अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि कर्तव्यनिष्ठेची भावना अधिक दृढ झाली.
Latest News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त “एक घंटा मैदान में” उपक्रमाचे आयोजन
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
