राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त “एक घंटा मैदान में” उपक्रमाचे आयोजन
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे विविध क्रीडा उपक्रम उत्साहात संपन्न
भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या दिनाच्या अनुषंगाने शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा संस्कृती आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी “एक घंटा मैदान में” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी व अंमलदारांसाठी विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सायकलिंग, व्हॉलिबॉल आणि कबड्डी या व इतर क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
सायकलिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींनी शारीरिक सहनशक्ती व तंदुरुस्तीचे दर्शन घडविले. तसेच व्हॉलिबॉल आणि कबड्डीच्या सामन्यांमध्ये प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट संघभावना, शिस्त, समन्वय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले.
पोलीस दलामध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीला विशेष महत्त्व आहे. नियमित क्रीडा व व्यायामाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अधिकारी व अंमलदारांची शारीरिक क्षमता वृद्धिंगत करण्यासोबतच त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि संघभावना विकसित होण्यास मदत होते.
“एक घंटा मैदान में” या उपक्रमातून दररोज किमान एक तास शारीरिक तंदुरुस्तीसाठी देण्याचा आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे क्रीडा, तंदुरुस्ती आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, सक्षम, सुदृढ आणि कार्यक्षम पोलीस दल घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
“एक घंटा मैदान में – सुदृढ शरीर, सुदृढ मन आणि सक्षम पोलीस दल!”
Latest News
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस

